My Blog List

Thursday, September 9, 2010

वेध पहाटेचा.......

ढगाळलेल्या अस्मानाला,
वेध जणू रविकिरणाचा......
दगडामधल्या तृण फुलाला,
वेध सुगंधी मातीचा.......
दशदिशांत सुसाट वाऱ्याला,
रोखणाऱ्या शिखराचा.....
खळाळणाऱ्या सागराला,
वेध किनाऱ्याचा.....
ध्येयासक्त माणसाला,
वेध क्षितिजाचा....

जीवनाची पाऊलवाट,
अन मातीतल्या पाऊलखुणा....
कधी होईल पहाट,
हाच वेध मना....    

                                   - नूतन घाटगे 

Tuesday, September 7, 2010

जेव्हा कोसळले आभाळ.....

उदास वादळ फिरून गेले
शेष न जीवनी काही..
अश्रुंचे हुंदके भरून आले
बंदिस्त दिशा दाही.....

मिटताच पापणी,
तडीपार जाहल्या स्वप्नांच्या पंगती....
हलकेच सावरी
परि त्यात पाहिल्या काट्यांच्या संगती..

दूर चांदणे गगनात...
एकांती प्रवास....
मिटून गेल्या नयनांच्या ज्योती...
मज चंद्र पाहण्या लालस...

ओढ क्षितिजाची
मज मृगजळाचा आभास..
पण उठताच नजर ...
अंधुक आकाश.....
कोसळले आभाळ अन
भरलेल्या डोळ्यांनी पाहिला
जीवनाचा संन्यास......

                  - नूतन घाटगे




प्रेमाच्या पाऊसधारा.......

क्षणात  येता पाऊसधारा,
गडगडले मेघ अंतरी...
प्रेमवर्षा बरसवण्या,
आसुसले मन तुझ्यावरी...

खिळल्या नजरेत नजरा,
नि:शब्द ओठ जरी,
हिरमुसलेला अल्लड वारा,
प्रीत आपली सावरी,

प्रेमसागर खळाळणारा,
भावनांचे मनात मंथन....
स्पर्श तुझा भिजवणारा,
दे तुझ्या बाहूंचे बंधन....

वर्षा थेंब ओघळणारा,
माझ्या गुलाबी गालावरी.....
ओठाने तू टिपून घेता,
आला शहारा अंगावरी  ....

प्रेम घन ओथंबणारा,
बरसू दे माझ्यावरी....
हृदयात तुझ्या मज
विसावू दे निरंतरी....

- नूतन घाटगे

मैत्री

मैत्रीच्या विश्वामध्ये माझ्या,
पाऊल तुझे पहिले....
न आठवते मज आज परि,
भाग्यवान मी जाहले.....

सुंदर मुक्त मणी आठवणींचे,
नात्याच्या बंधात ओविले....
मैत्रीतील आनंदी क्षण,
हृदयात मी साठविले.....

नात्यात आपल्या न कधी येवो अंतर,
शेवटच्या श्वासापर्यंत.....
साथ राहो अशीच निरंतर......
                                   
                                     - नूतन घाटगे.